घोरण्याच्या समस्येवर उपाय काय?

वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे

घोरणे ही क्रिया व्याधी असू शकते याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. याचे कारण आपल्या आजूबाजूची अनेक मंडळी घोरताना आढळून येतात. मात्र घोरण्याच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर घोरत असाल तर आपली वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याचे कारण जे लोक अनेक दिवसांपासून घोरतात त्यांना उच्च रक्‍तदाब, हृदय विकार यासारख्या गंभीर व्याधी होतात असे दिसून आले आहे.

झोपेत माणूस घोरणे ही काही विशेष बाब राहिलेली नाही. अनेक जण झोपेत मोठमोठ्यांदा घोरत असतात. यापैकी अनेकांना आपण झोपेत घोरतो हेच मुळी माहीत नसते. जर तुम्ही घोरत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक दिवसांपासून तुमचे घोरणे चालू असेल तर त्याचा विपरित परिणाम मेंदू आणि हृदयावर होत असतो.

घोरणे ही काही असाध्य व्याधी नाही. आपण घोरतो आहोत ही गोष्ट आपल्याला कुटुंबियांकडून कळते. “तू रात्री किती घोरतोस’ असे कोणी आपल्याला म्हटले तर आपण त्याचे म्हणणे लगोलग फेटाळून लावतो. याचे कारण आपण झोपेत घोरतो हे आपल्याला ठाऊक असणे शक्‍यच नसते. तुम्ही घोरत आहात याचा अर्थ तुम्हाला श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. श्‍वास घेण्यास त्रास होणे ही व्याधी किंवा आजार दुर्मिळ नाही. अनेकांना श्‍वास घेण्याची समस्या दीर्घकाळापासून जाणवत असते; मात्र श्‍वास घेण्यास त्रास होत असेल आणि त्याकडे तुम्ही अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला गाढ झोप मिळू शकणार नाही. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होताना दिसतो. घोरण्याचा अन्य व्यक्‍तींना होणारा त्रास हा वेगळाच असतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा विचार करून घोरण्याच्या समस्येवर मार्ग काढण्याचा निश्‍चय केला पाहिजे.

माणूस का घोरतो?
आपल्या श्‍वासनलिकेच्या जवळपास अतिरिक्‍त मेदयुक्‍त घटक जमा झाल्यामुळे श्‍वासनलिकेला जोडणाऱ्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. श्‍वासाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्या नैसर्गिकरित्या श्‍वास घेण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. त्यामुळे आपण घोरतो. झोपताना तुमचे तोंड बंद असेल आणि तुम्ही घोरत असाल तर तुमच्या जीभेच्या रचनेचा संबंध त्याच्याशी जोडला जातो. झोपताना तुमचे तोंड उघडे असेल आणि तुम्ही घोरत असाल तर त्याचा संबंध श्‍वासनलिकेच्या आसपास जमा झालेल्या मेदयुक्‍त पदार्थांशी असतो.

घोरणे म्हणजे झोपेत श्‍वास घेताना मोठा आवाज होणे. सर्दी किंवा ऍलर्जी झाल्यास अनेक जण घोरतात. मात्र असे घोरणे हंगामी स्वरुपाचे असते. सर्दी गेल्यावर किंवा ऍलर्जी दूर झाल्यावर अशा प्रकारचे घोरणे आपोआप थांबते. काही वेळा गर्भावस्थेतील महिला गळ्यात चरबीयुक्‍त भाग जमा झाल्यामुळे घोरतात असे दिसून आले आहे.

रुग्ण नेमक्‍या कोणत्या कारणामुळे घोरतो यामागची कारणे शोधली जातात आणि त्यानुसार उपचार केले जातात. आपण स्वतःही आपल्या झोपेची वैद्यकीय पाहणी करू शकतो. बाजारात आपल्या झोपेच्या अवस्थेत शरीरातील वेगवेगळ्या हालचालींची नोंद ठेवणारे उपकरण मिळते. ज्यांना अनेक दिवसांपासून घोरण्याची समस्या जाणवत आहे अशा व्यक्‍तींना उच्च रक्‍तदाब, रात्री झोपेत छातीमध्ये दुखणे, एकाग्रता होऊ न शकणे, रक्‍तशर्करा नियंत्रणात न राहणे, फुफ्फुसांना संसर्ग होणे अशा व्याधी होण्याची शक्‍यता अधिक असते. ज्या व्यक्‍ती अनेक दिवसांपासून घोरतात त्यांची हाडे ठिसूळ असतात. सततच्या घोरण्यामुळे मेंदूला रक्‍तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या प्रसरण पावतात. या रक्‍तवाहिन्यांचा काही भाग श्‍वासनलिकांच्या खूप जवळ असतो. घोरण्यामुळे होणाऱ्या कंपनांचा परिणाम या रक्‍तवाहिन्यांवर होतो. या रक्‍तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे मस्तिष्काघात (ब्रेन हॅमरेज), तसेच रक्‍तवाहिन्या कडक होण्याची शक्‍यता अधिक असते. अशा स्थितीत हृदयाच्या कार्यावर अनिष्ट परिणाम होण्याची दाट शक्‍यता असते.

घोरणे हे स्लीप ऍप्नीया नामक व्याधीचे लक्षण असू शकते. स्लीप ऍप्नीया या व्याधीमध्ये झोपेत श्‍वास घेण्यास त्रास होत असतो. या व्याधीमुळे रक्‍तामधील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच घोरणे सुरू होते. अनेकांना झोपेमध्ये आपली श्‍वास घेण्याची प्रक्रिया काही काळ बंद झालेली होती, हे समजतही नाही.

अनेकदा श्‍वास घेणे थांबल्याने आणि गळा भरून आल्यामुळे (चोक झाल्यामुळे) झोपेतून जाग येते; मात्र ज्यांना स्लीप ऍप्निया ही व्याधी झालेली आहे अशी सर्व मंडळी घोरतात असेही नाही. घोरणाऱ्या लोकांपैकी 20 टक्‍के जणांना स्लीप ऍप्नीया झालेला असतो. अधिक वजन असलेल्या महिलांना रजोनिवृत्तीनंतर स्लीप ऍप्नीया होण्याची शक्‍यता अधिक असते. वयोमानानुसार ही व्याधी होण्याची शक्‍यता बळावते.

जर तुम्ही खूपच मोठ्याने घोरत असाल आणि तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. बोलताना, टीव्ही बघताना, गाडी चालवताना अचानकपणे डोळा लागणे हेही लक्षण दुर्लक्षित करण्याजोगे नाही. अशांनी त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक ठरते.

घोरण्याची प्रमुख कारणे
1) जाडीमुळे श्‍वासनलिका आणि मुखनलिका यांच्यामध्ये चरबी जमा होणे.
2) वयोमानानुसार गळ्यातील नलिका आकुंचन पावणे. या कारणामुळे पुरुषांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
3) मद्यपान, धूम्रपान आणि नैराश्‍य यांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम म्हणून अनेक जण घोरतात.
4) अस्थमा आणि सायनस या कारणांमुळेही अनेक जण घोरतात.
5) ज्यांची टाळू व्यवस्थित भरली गेलेली नाही तसेच ज्यांचा जिभेचा आकार प्रमाणापेक्षा मोठा आहे आणि टॉन्सिल्स या कारणांमुळेही घोरण्याची समस्या उद्‌भवू शकते.

…तर हे उपाय अवश्‍य करा
1. आपले वजन कमी करण्याकडे लक्ष द्या.
2. नियमित व्यायाम करा.
3. झोपण्या अगोदर धुम्रपान, मद्यपान, गच्च जेवण करू नका.
4. उताणे झोपण्या ऐवजी कुशीवर झोपा.
5. ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत पुरेशी हवा येते आहे याकडे लक्ष द्या.
6. जाड उशी अथवा लोड घेऊन झोपा.
7. जर घशात खवखव होत असेल तर पाण्यात मीठ घालून गुळण्या करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.