बर्मिंगहॅम – मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदलले जात आहे. माझ्या प्रशिक्षकांना अधिकाऱ्यांकडून सतत त्रास होत असल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत अडथळे येत आहेत. यामुळे मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अन्यायाला वाचा फोडली आहे.
भारतीय बॉक्सिंग संघ रविवारी रात्री आयर्लंडमधील प्रशिक्षणानंतर येथील गेम्स व्हिलेजमध्ये पोहोचला; परंतु लोव्हलिनाच्या वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंगजी यांना मान्यता नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग खेळात बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. ही स्पर्धा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लोव्हलिनाने ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, मी सर्वांना माझ्यासोबत सतत होणाऱ्या छळवणुकीबद्दल सांगू इच्छिते. ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिक पदक जिंकण्यास मदत केली, त्यांना नेहमीच बाजूला केले जात आहे. ज्यामुळे माझ्या प्रशिक्षणाच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम झाला आहे.
प्रशिक्षकांपैकी एक संध्या गुरुंगजी आहेत, ज्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या आहेत. पण असं असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी हजारदा हात जोडून विनंती केल्यानंतर उशिराने सोडले जाते.
इस्तंबूलमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वीही अशीच वागणूक सहन केली. आता बर्मिंगहॅम गेम्समध्येही असेच काही घडेल अशी भीती वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.
या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आले आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसं फोकस करू हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन, असे तिने म्हटले आहे.
दरम्यान, या पोस्टनंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही याबाबत पोस्ट करत योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.