बेंगळुरू – भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक करुणा जैनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बेंगळुरू येथे जन्मलेल्या करुणाने तिच्या कारकिर्दीत भारत, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.
करुणाने नोव्हेंबर 2005मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने 5 कसोटी सामन्यात 195 धावा केल्या आहेत. यादरम्यान 40 धावा ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. करुणाने तिच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
“मी अतिशय आनंदी आणि समाधानी भावनांसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करते आणि खेळासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे”, असे करुणाने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे. दरम्यान, तिने बीसीसीआय, एअर इंडिया, कर्नाटक, पुद्दुचेरी यांचेही आभार मानले आहेत.
करुणा जैन हिने कसोटी क्रिकेटसह भारतासाठी 44 एकदिवसीय आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि अनुक्रमे 987 आणि 9 धावा केल्या. 2004 मध्ये तिच्या वनडे पदार्पणात, तिने लखनौमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 64 धावा केल्या होत्या.