पुणे – दसऱ्याच्या पूर्वसंधेवर फूलबाजार बहरला. फुले खरेदीसाठी नागरिकांनी महात्मा फुले मंडई, तसेच मार्केट यार्डातील फूल बाजारात सोमवारी (दि.23) सकाळपासून गर्दी केली होती. यंदा दसऱ्याला झेंडूची मोठी आवक झाल्याने भावात घट झाली. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो झेंडूला 40 ते 80 रुपये असे भाव मिळाले.
दसऱ्याला सर्वाधिक मागणी झेंडू, गुलछडी, शेवंती, ऍस्टर या फुलांना असते. मार्केट यार्डात पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस पाठविला. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे झेंडूच्या प्रतवारीवर परिणाम झाल्याचे फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली. यंदा चांगल्या प्रतीच्या झेंडूला भाव मिळाले.
घाऊक फूलबाजारातील फुलांचे भाव (किलो)
झेंडू – 10 ते 50 रुपये
शेवंती – 150 ते 220 रुपये
गुलछडी – 300 ते 430 रुपये
ऍस्टर – 100 ते 150 रुपये
मार्केट यार्डात झुंबड, वाहनांची कोंडी
मार्केट यार्डात फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी सोमवारी गर्दी केली. शिवनेरी पथावर शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस मांडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. मार्केट यार्डात गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली आहेत. शेतकऱ्यांना शिवनेरी पथावर झेंडूची विक्रीची मुभा देण्यात आली होती. दरम्यान, फुल खरेदीसाठी पहाटेपासून गर्दी झाली.
फुलवाहतूक करणारे टेम्पो आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. बाजार समितीच्या प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या संख्येने खरेदीदार आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. टेम्पो, रिक्षा अशा वाहनांतून किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी झेंडू नेला. वाहन तळावर जागा नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागला