Suhani Bhatnagar : अभिनेता आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘दंगल’मध्ये लहान बबिता फोगटची भूमिका सुहानीने साकारली होती. सुहानी काही दिवसांपासून आजारी होती. सुहानीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत आणि सुहानीने अवघ्या 19 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
सुहानीच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड दु:खी झाले असून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुहानी फरिदाबादमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. काही दिवसांपूर्वी सुहानीचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी ती औषधे घेत होती. उपचार सुरू असतानाच तिला औषधांमुळे रिएक्शन होऊन शरीरात संपूर्ण पाणी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
सुहानी भटनागरने 2016 मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयासोबतच सुहानीला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती. या चित्रपटाशिवाय सुहानीने अनेक जाहिराती केल्या होत्या. मात्र, दंगलच्या माध्यमातूनच तिला लोकप्रियता मिळाली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. तिच्या निरागसपणाने आणि अभिनयाने चाहत्यांनी तिचे कौतुक केले होते. दंगल चित्रपटातनंतर तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नव्हते.