कासेगाव – देशातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य म्हणून ओळख असणाऱ्या कासेगाव येथील यल्लमा देवीच्या मंदिरात पहाटे चोरी झाली. चोरांनी देवीच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुकांसह जवळपास 10 लाखांचे दागिने लांबवले असल्याचे समोर आले आहे. चोरीची घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील तृतीयपंथी आणि जोगतीण यांचे आराध्य देवस्थान म्हणून कासेगाव येथील यल्लम्मा देवी प्रख्यात आहे. पहाटे दोन नंतर पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या आणि मागील दाराने आत येऊन चोरांनी दोन दरवाज्यांची कुलुपे तोडून मंदिरात प्रवेश केला.
या अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास ही चोरी केल्याचे पुजारी मुकुंद जाधव यांनी सांगितले. यानंतर तातडीने पुजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
गेले काही दिवसांपासून मंदिराचे सीसीटीव्ही बंद आहेत. यात्रेपूर्वी हे सीसीटीव्ही दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे ठरले होते. मात्र त्या पूर्वीच ही चोरी झाल्याने कासेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार केली आहेत.