पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) डी.एड. आणि बी.एड. शिक्षणशास्त्र पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेने 10 ऑक्टोबरला होणाऱ्या टीईटीचे अर्ज भरण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली असून, 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
टीईटीसाठीच्या अर्जांची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू झाली. मात्र, डी.एड. आणि बी.एड. झालेल्या उमेदवारांनाच टीईटी देण्याची मुभा परीक्षा परिषदेने दिली होती. त्याविरोधात उमेदवारांनी आवाज उठवल्यानंतर शिक्षण विभागाने डी.एड. आणि बी.एड.च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरण्यास परवानगी देण्याचे आदेश परीक्षा परिषदेला दिले.
व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी टीईटीचा अर्ज भरताना व्यावसायिक अर्हतेची माहिती भरताना त्यांना लागू असलेल्या पदविका, पदवी यासंदर्भात मागील परीक्षेची माहिती भरावी.
प्रमाणपत्र क्रमांकाऐवजी संबंधितांनी त्यांच्या परीक्षेचा बैठक क्रमांक नोंद करावा. प्रवेश अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 सप्टेंबर आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.