Cyclone Michaung : सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ‘मिचॉन्ग’ नव्या वादळाचा धोका निर्माण झाला आहे. आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच या चक्रीवादळाचा पूर्व किनारपट्टीवरही परिणाम होण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान खात्याने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी पाऊस, वादळ आणि वीज पडण्याचा इशारा दिला आहे. सरकारने खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाच्या संदर्भात मी देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच सांगितले. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत.
एका वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदींनी तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांना मदत आणि बचाव कार्यात सामील होण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले. भाजपच्या मुख्यालयात निवडणुकीतील विजयावर केलेल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान म्हणाले, “चक्रीवादळ ‘मिचॉन्ग’ पूर्व किनारपट्टीवर परिणाम करू शकते. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सतत संपर्कात असून त्यांना मदत करत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. म्यानमारने या चक्रीवादळाला Michaung हे नाव दिले आहे, ज्याचा इंग्रजीत उच्चार मिगजॉम (Migjom) असा होतो. या शब्दाचा अर्थ लवचिकता आणि सामर्थ्य दर्शवतो.