सिंधुदुर्ग – देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बाजी मारली. तर तेलंगणामध्ये कॉँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयानंतर नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज नौदल दिन साजरा केला जाणार असून नरेंद्र मोदी येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ते महाराष्ट्रात येतील.पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 हजार पोलीस, 400 पोलीस अधिकाऱ्यांसह 500 होमगार्ड तैनात असणार आहेत. प्रशासनाकडून मोदींच्या दौऱ्यासाठी चोख आणि कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील. इतिहासात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा केला जात आहे. यापूर्वी नौदल दिन मुंबईत साजरा केला जात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास असलेल्या सागरी दुर्गावर यंदाचा नौदल दिन साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि रणनिती अभ्यास नौदलासाठी प्रेरक ठरेल.
तसेच, या सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा प्रयत्नही नौदलाकडून होत आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. तारकर्ली एमटीडीसीजवळ प्रमुख कार्यक्रम होणार असून नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे पंतप्रधानांचं स्वागत करणार आहे. यावेळी, नौदलाकडून आपली प्रात्यक्षिके दाखवत देशाचं सागरी सामर्थ्य जगाला दिसणार आहे.