Mizoram Assembly Election 2023 Result: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (३ डिसेंबर) जाहीर झाले. चारपैकी तीन राज्यांत भाजपाने बाजी मारली आहे. तर काँग्रेसला तेलंगणा या केवळ एका राज्यात विजय मिळवता आला. या चार राज्यांसह मागील महिन्यात मिझोराममध्ये 40 विधानसभेच्या जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानुसार या राज्यातील निकाल देखील काल जाहीर होणार होता. मात्र मिझोरामची विधानसभा निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने मिझोराम राज्यातील मतमोजणी एका दिवसाने पुढे ढकलली. त्यानुसार आज सकाळी 8 वाजल्यापासून येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
मिझोराममध्ये ‘मिझो नॅशनल फ्रन्ट’ (एमएनएफ) आणि झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) या दोन आघाड्यांत अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यातच आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार, झेडपीएम 26, एमएनएफ 9, भाजपने 3 आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे कल आहेत. मिझोराम विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्यासाठी बहुमताचा आकडा 21 ठेवण्यात आला आहे. त्यानुसार झेडपीएमने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मिझोरममध्ये 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 174 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), प्रमुख विरोधी पक्ष झोराम पिपल्स मुव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेसने 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार असं वाटत होतं. मात्र, आता सुरुवातीच्या कलांनंतर याठिकाणी काँग्रेसचा बार फुसका निघाल्याचे पाहायला मिळाले आहे. येथे एमएनएफ आणि काँग्रेस पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे.