Rahul Gandhi | Helicopter : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील प्रमुख नेते भिंगरी लावून प्रचारासाठी फिरत आहेत. प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी अनेक नेते हेलिकॉप्टरने प्रवास करत असतात. काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडूच्या निलगिरी येथून उड्डाण घेत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती.
यामध्ये राहुल गांधी आणि तृणमूल कॉंग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचा समावेश होता. आता हे प्रकरण चांगलेच तापत चालले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे. त्याद्वारे हेलिकॉप्टर तपासणीच्या कृतीचे आयोगाकडून समर्थन करण्यात आले आहे. । Rahul Gandhi | Helicopter
हवाई मार्गाच्या माध्यमातून प्रलोभन दर्शवणारी सामग्री पाठवली जात नाहीये ना याची खातरजमा करण्यासाठी देशभरात सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणची तपासणी केली जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने १५ एप्रिल रोजी राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ जारी केला होता. तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर चेक केले होते असे त्यात दिसून येते आहे.
राहुल गांधी निलगीरी येथे पोहोचताच आयोगाच्या भरारी पथकाने ही तपासणी केली होती. यासंदर्भात कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी केली जाण्याची मागणी त्यांनी केली होती. आयोगाने सगळ्यांना समान वागणूक द्यावी अशी भूमिका रमेश यांनी मांडली होती. । Rahul Gandhi | Helicopter
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरवर १४ एप्रिल रोजी आयकर विभागाने छापा मारला होता असा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. यासंदर्भात आयकर विभागाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.