बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरं सुवर्णपदक ठरले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण पाच पदकं जिंकली आहेत. या कामगिरीसह भारताने टॉप-10 मध्येही प्रवेश केला आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवित “सुपर संडे’ साजरी केला.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने 67 किलो वजनी गटात एकूण 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये 140 किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे.
सुवर्णपदक जिंकल्याचा मला आनंद आहे, परंतु मी माझ्या कामगिरीवर समाधानी नाही. मी आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत होतो. तसेच देशासाठी सुवर्ण जिंकणे हा अभिमानाचा क्षण आहे.
– जेरेमी लालरिनुंगा
तत्पूर्वी, बिंद्याराणी देवीने महिलांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून भारताची पदकांची संख्या चारवर नेली. 114 किलो वजनाच्या दुसऱ्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात ती अयशस्वी झाली.
पण तिने अंतिम लिफ्टसह 116 किलो वजनाचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या स्थानावर जाण्यात यशस्वी ठरली. तिचे फक्त एक किलो वजनाने सुवर्णपदक हुकले.