बर्मिंगहॅम – भारताचा लांब उडी क्रीडा प्रकारातील उदयोन्मुक खेळाडू मुरली श्रीशंकर याने अपयशाच्या गर्तेतून बाहेर येत एतिहासिक कामगिरी केली व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रजतपदक पटकावले. त्याने पुरुषांच्या लांब उडीत 8.08 मीटर अंतर नोंदवताना ही अफलातून कामगिरी केली. त्याने सहाव्या क्रमांवरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत पदकावर नाव कोरले.
केरळमधील पलक्कडचा रहिवाशी असलेला श्रीशंकर लांब उडी क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. मात्र, त्याने मिळालेल्या संधीचा लाभ घेत पाचव्या प्रयत्नात एका उडीच्या जोरावर त्याने थेट दुसरा क्रमांक मिळवला व रजतपदकावरही नाव कोरले.
यापूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक मिळवले आहे. मात्र, पुरुषांमध्ये आपण पदकापासून आजवर दूर होतो. ही उणीव श्रीशंकरने भरून काढली. या स्पर्धेत श्रीशंकरने चौथ्या प्रयत्नात 8 मीटरची मारलेली लांब उडी नियमबाह्य ठरवण्यात आली. पण त्याने पाचव्या प्रयत्नात 8.08 मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत रजतपदक मिळवले.
Historic Silver Medal For The Country! #MuraliSreeshankar wins India’s first ever Silver medal in Long Jump at #CWG2022
Congratulations & A Billion Blessings For The Champion!#CWG2022#Cheer4India #CWG2022India #India4CWG2022#IndiaTaiyaarHai pic.twitter.com/loL8O7JacD
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 5, 2022
श्रीशंकरने चौथ्या प्रयत्नात 8 मीटरपेक्षाही जास्त लांब उडी मारली होती, पण लॅंडिंग बोर्डवर 1 सेंटिमीटरचा फरक असल्याचे रेफ्रींनी सांगितले व हा प्रयत्न फाऊल ठरवला गेला. पाचव्या प्रयत्नामध्ये त्याने ही कसर भरून काढली. या स्पर्धेत श्रीशंकर 8.36 मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह सुवर्णपदकाचा दावेदार होता. पण त्याला रजतपदकावर समाधान मानावे लागले. बहामासच्या लॅक्यून नैर्नेने या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रीशंकर आणि त्याच्यामध्ये चांगलीच स्पर्धा रंगली. 8.08 मीटरसह संयुक्तपणे सुवर्णपदकासाठी श्रीशंकर व नैर्न हे दावेदार होते. श्रीशंकरचा सहावा प्रयत्न फाऊल ठरला व नैर्नने सुवर्णपदक मिळवले.