World Cup 2023 #INDvPAK Match Updates : एकदिवसीय विश्वचषक2023 च्या स्पर्धेत उद्या (शनिवार, 14 ऑक्टोबर) महामुकाबला होणार आहे. खरे तर उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा उत्साह शिगेला पोहोचतो. 2023 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्ध विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बाबर सेनेचं मनोबल उंचावले आहे. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघाला आतापर्यंत भारताविरुद्ध विजय मिळवता आला नसला तरी, तरीही टीम इंडियाला पाकिस्तानच्या या तीन खेळाडूंपासून सावध राहावे लागणार आहे.
1. बाबर आझम…
पाकिस्तानचा कर्णधार आणि सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या बाबर आझमला या विश्वचषकात आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध त्याची बॅट चालली नाही, पण भारताविरुद्ध तो अडचणीचा ठरू शकतो. बाबर त्याच्या एकट्याच्या जिवावर सामना जिंकून देऊ शकतो.
2. शाहीन शाह आफ्रिदी…
पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पहिल्याच षटकातच विकेट घेण्यात माहीर आहे. हे त्याने अनेकदा केले आहे. रोहित शर्मा, इशान किशन आणि विराट कोहली यांना शाहीनच्या गोलंदाजीचा संभाळून सामना करावा लागेल. वेगाने स्विंग करण्यात पटाईत असलेल्या शाहीनने 2023 आशिया चषकाच्या साखळी सामन्यात (2 सप्टेबर) भारताचा धुव्वा उडवला होता, त्याने रोहित शर्मा, विराट कोहली,हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांना बाद करत 4 विकेट घेतल्या होत्या. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला होता आणि शाहीनच्या कामगिरीवर पाणी फेरले गेले होते. अहमदाबादमध्येही तो आश्चर्यजनक कामगिरी करू शकतो.
3. मोहम्मद रिझवान…
श्रीलंकेविरुद्ध 131 धावांची नाबाद खेळी खेळून पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान भारतासमोरही अडचणी निर्माण करू शकतो. तो प्रत्येक चेंडूवर धावा काढण्यासाठी ओळखला जातो. रिझवानला शांत ठेवणे गोलंदाजांसाठी खूप कठीण ठरू शकतो. रिझवानने विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये 199 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो भारताविरुद्धही घातक ठरू शकतो.