नवी दिल्ली – भारतीय संघाने आपल्या विश्वचषकाच्या मोहिमची (Mission World Cup) दणक्यात सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाला (India beat Australia) पराभूत करत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालीय. 11 ऑक्टोबरला भारतीय संघ अफगाणिस्तानशी (India vs Afghanistan) भिडणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरु होईल.
चेन्नईत ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर टीम इंडिया आता दिल्लीत दाखल झाली आहे. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, तो बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयने याला दुजोरा दिला आहे.
बीसीसीआयने जारी केले वैद्यकीय अपडेट…
बीसीसीआयने शुभमनबाबत वैद्यकीय अपडेट दिले आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, ” टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल 9 ऑक्टोबरला टीमसोबत दिल्लीला जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळला जात असताना हा सलामीचा फलंदाज खेळू शकला नाही. त्यानंतर आता 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टीम इंडियाच्या पुढील सामन्यातही तो खेळू शकणार नाही. शुभमन चेन्नईत राहणार असून तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.”
🚨 Medical Update: Shubman Gill 🚨
More Details 🔽 #TeamIndia | #CWC23 | #MeninBluehttps://t.co/qbzHChSMnm
— BCCI (@BCCI) October 9, 2023
तसेच बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन डेंग्यूने ग्रस्त आहे. डेंग्यूमधून बरे होण्यासाठी आणि पुन्हा मॅच-फिट होण्यासाठी खेळाडूला साधारणत: 7-10 दिवस लागतात. तथापि, प्लेटलेटच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यास, रुग्णाला बरे होण्यास जास्त वेळ लागू शकतो. 14 ऑक्टोबरला होणार्या पाकिस्तानच्या बहुप्रतिक्षित लढतीपर्यंत तो तंदुरुस्त नसेल तर या सामन्यालाही तो मुकण्याची शक्यता आहे.
किशनला मिळणार आणखी एक संधी…
चेन्नई येथे झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्याला सलामी फलंदाज शुभमन गिल मुकला होता. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल याला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळू शकला नाही. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नव्हतं. इशान शून्यावर बाद झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्धही शुभमन खेळणार नसल्यामुळे, त्याच्या जागी इशानलाच सलामीला खेळण्याची आणखी एक संधी मिळणार असणार आहे.
अफगाणिस्ताननंतर भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध…
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याव्यतिरिक्त, शुभमन 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातूनही बाहेर राहू शकतो. शुभमनने यावर्षी 1200 धावा केल्या आहेत आणि अलीकडेच कर्णधार रोहित शर्मासह एक यशस्वी सलामीचा फलंदाज म्हणून पुढं आला आहे. तो दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्यास भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का असू शकतो.
अफगाणिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.