आमदारांच्या सभागृहातील कामगिरीबाबत उत्सुकता

सम्राट गायकवाड

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने द्यावा लागणार आढावा : चार महिन्यांचा अवधी बाकी

संकेतस्थळावर माहिती अनुपलब्ध

लोकसभा व राज्यसभा सदस्यांची संसदेतील उपस्थिती व विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची संख्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा महाराष्ट्र विधीमंडळाच्या संकेतस्थळावर आमदारांची उपस्थिती व विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांच्या संख्येची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी त्याबाबतची माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

सातारा – नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या संसदेतील कामगिरीबाबत सातत्याने प्रश्‍न विचारले गेल्याने आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील विद्यमान आमदारांना सभागृहातील कामगिरीचे रेकॉर्ड आतापासूनच तयार करावे लागणार आहे. विशेषत: सुशिक्षित व युवक मतदारांमध्ये लोकप्रतिनिधीच्या कार्य व कर्तव्याबाबत जागृती होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहे. अशावेळी आमदार कशाप्रकारे आपली कामगिरी जनतेसमोर मांडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभेच्या निवडणूक आता चार महिन्यांवर येवून ठेपली आहे. विद्यमान आमदारांसह विरोधी पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सर्वांनी प्रचाराची एक फेरी पुर्ण केली. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या संसदेतील कामगिरीबाबत विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांनी प्रचारा दरम्यान सातत्याने प्रश्‍न उपस्थित केले. त्यामुळे साहजिकच सातारा जिल्ह्यातील निवडणूकीच्या इतिहासात लोकप्रतिनिधींच्या कार्य आणि कर्तव्याबाबत मतदारांमध्ये जागृती होण्यास सुरूवात झाली. त्याचा मोठा परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणूकीत दिसून येईल. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेच्या निवडणूकीत मतदार आणि विरोधी पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदारांच्या सभागृहातील कामगिरीचे प्रगती पुस्तक मागणार, हे निश्‍चित आहे. अशावेळी विद्यमान आमदारांनी कशा प्रकारे सभागृहात प्रश्‍न उपस्थित केले, याची माहिती आतापासून प्राप्त करायला लागतील, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करित आहेत.

सातारा जिल्ह्यात आठ आमदार आहेत. त्यामध्ये सर्वच आमदारांची प्रत्येकी दुसरी, तिसरी व चौथी टर्म आहे. आ.शशिकांत शिंदे व आ.बाळासाहेब पाटील चार वेळा, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले तीन वेळा, आ.दिपक चव्हाण, आ.शंभूराज देसाई, आ.मकरंद पाटील व आ.जयकुमार गोरे दोन वेळा तसेच आ.पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेसह विधानसभा असे दोन टर्म सभागृहात कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच आमदारांकडून मतदारांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्याचबरोबर आमदारांच्या कार्य व कर्तव्याबाबत मतदारांमध्ये जागृती होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील आ.शंभूराज देसाई वगळता उर्वरित सात आमदार विरोधी पक्षात आहेत.

सत्ताधारी आमदारांकडून मतदारांच्या विकासकामे होण्यासह प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची अपेक्षा मतदारांची आहे व असते. तर विरोधी पक्षातील उमेदवारांनी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सभागृहात किती वेळा आवाज उठविला? सभागृहात किती दिवस उपस्थिती राहिली ? यासह अनेक प्रश्‍नांचा भडीमार मतदारांकडून होणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे साहजिकच विद्यमान आमदारांना आपले प्रगती पुस्तक तयार करण्यास अत्तापासून सुरूवात करणे आवश्‍यक आहे. अन्यथा ऐनवेळी विरोधकांनी प्रगती पुस्तक बाहेर काढले तर त्याचा सामना विद्यमान आमदारांना करावा लागणार, हे निश्‍चित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.