पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांसह बहुतांश व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी मिळताच हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरू लागल्याने तसेच गेल्या चार दिवसांत प्रतिदिन वीसहून अधिक करोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीतील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वच्या सर्व व्यवसाय ठप्प झाला होता. लॉकडाऊन चार घोषित केल्यानंतर घेतलेल्या फेरआढाव्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले होते. तसेच शहरातील उद्योग, व्यवसाय काही अटी व शर्ती घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. गुरुवारपासून शहरातील बहुतांश दुकाने, बाजारपेठा, कंपन्या आणि लघुउद्योग खुले करण्यात आले होते. तर मुख्य बाजारपेठांमध्ये सम आणि विषय तारखेला दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
मात्र, दुकाने उघडताच दोन महिन्यांपासून घरात बसून असलेले नागरिक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आणि बाजारपेठेत उतरल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून शहरात दिसत होते. अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करताना करोनाला प्रतिबंध करण्यासाठी ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन केले जात नसल्याचे समोर आले होते. त्यातच गेल्या तीन दिवसांत शहरात तब्बल 90 च्या आसपास रुग्ण आढळून आल्याने दहशत निर्माण झाली होती. आजचा रविवार आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी कॅम्पातील पूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयाची पुढे अंमलबजावणी केली जाणार की दुकाने पुन्हा उघडली जाणार याबाबत मात्र पालिका प्रशासनाने कोणतीच सूचना जाहीर न केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.