वाई (प्रतिनिधी) – वाई तालुक्यातील पूर्व आणि पश्चिमेकडील भागातील गावांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
पूर्व भागातील भुईंजशेजारच्या देगावमध्ये एक खासगी गाडीचालकाचा अहवाल काल (दि. 23) रात्री पॉझिटिव्ह आला, तर पश्चिम भागातील आसरे, वासोळे व दह्याट या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. हे सर्व जण मुंबई व अन्य ठिकाणांहून तालुक्यात आले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या चार झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेले अडीच महिने वाई तालुक्यातील ग्रामीण भागात 24 तास उभा पहारा ठेवून ग्रामस्थांनी करोनापासून गावाचा बचाव केला होता; परंतु रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, पुणे येथील लोक कुटुंबासमवेत आपापल्या गावी आल्याने त्यांच्यामार्फत वाई तालुक्यात करोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.