पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वॉर्ड रचनेला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरुवात करण्यात आली आहे. एकीकडे वॉर्ड रचनेला सुरुवात झाली असताना दुसरीकडे अफवांचे पीक निर्माण झाले आहे.
तीन सदस्यीय वॉर्ड रचनेचे काम अद्याप प्राथमिक पातळीवर असतानाच जुन्या वॉर्डाच्या रचना बदलल्याच्या अफवा पिकू लागल्या आहे. इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांना येणाऱ्या कॉलमुळे त्यांची आतपासूनच दमछाक सुरू झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानंतर तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीच्या निर्णयावर राज्यपालांचीही स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वॉर्ड रचना करण्याचे आदेश बजावले आहे.
आयुक्त राजेश पाटील यांनी वॉर्ड रचना समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी घेतली होती. वॉर्ड रचनेच्या कामाला बुधवारी (दि. 6) प्रत्यक्ष सुरुवात झाली. तर गुरुवारी (दि. 7) घटस्थापनेनिमित्त महापालिकेला सुट्टी होती. त्यामुळे अद्यापपर्यंत वॉर्ड रचनेचे खऱ्या अर्थाने कामही सुरू झालेले नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच अनेक विद्यमान नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या अनेकांना कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. त्यामुळे अनेकांची धावाधाव झाली. जुन्या वॉर्डातील हा परिसर तोडला आहे, नव्याने या भागाचा समावेश केला आहे, यासह आपले प्राबल्य असलेला परिसर दुसऱ्याच वॉर्डाला जोडला आहे, या व अशा अनेक प्रकारच्या विषयांबाबत फोन खणखणू लागले. अनेकांनी त्याची खातरजमा करण्यासाठी एकमेकांना फोन सुरू केले.
अचानक सकाळपासूनच हा प्रकार सुरू झाल्याने काही जणांनी महापालिकेच्या निवडणूक विभागात संपर्क साधून माहिती घेतली. मात्र, अद्याप प्राथमिक रेखांकनही झाले नसल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र या अफवाच असल्याचे सांगण्यात येत होते.
गतवेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला हवी तशी वॉर्ड रचना भाजपाच्या नेत्यांनी करून घेतल्याची टीका होत होती. त्या वेळी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत होते. त्याचा फायदा पक्षाला झाला होता. तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले होते. यंदा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे वॉर्डरचनेबाबत आतापासूनच अफवांचे पीक येऊ लागले आहे.
साठ जागांवर आरक्षण
ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश जारी झाल्यामुळे महापालिकेमध्ये 128 जागांपैकी लोकसंख्येनुसार 35 जागा या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी आरक्षित राहणार आहे. पन्नास टक्के महिला आरक्षण असल्यामुळे या जागांची संख्या 35 ऐवजी 36 इतकी होणार आहे. तर अनुसूचित जातींसाठी 20 जागांवर आरक्षण असणार आहे. तसेच अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आरक्षित असतील. या ठिकाणीही पन्नास टक्के आरक्षणामुळे 3 ऐवजी 4 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होणार असल्याने सर्वसाधारण गटातील 2 जागा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.