निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 87 कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

श्रीगोंदा: लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्‍तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली.

लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी, यासाठी श्रीगोंदा मतदारसंघातील सुमारे 2 हजार 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण श्रीगोंदा येथे देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा रविवारी पूर्ण झाला. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात पहिले प्रशिक्षण आज देण्यात आले.

श्रीगोंदा येथे एकूण 345 मतदान केंद्रासाठी 2 हजार 48 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या कर्मचारयांचे पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण आज घेण्यात आले. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्‍यक आहे. मतदाना दरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या कामावर नियुक्‍त झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणे आवश्‍यक राहते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी यंदा निवडणुक प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली. अशा दांडीबहाद्दर 87 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांच्यावर बडतर्फीचीही कारवाई करण्याचा इशारा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली आहे.

या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्‍यासह निवडणुकीच्या कामानिमित्त या तालुक्‍यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.