कराड -भाजी मंडईतील एका हॉटेलमध्ये पिस्तूल घेऊन बसलेल्या एस. टी. उर्फ सोहेल हरूण तांबोळी (वय 22, रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड) यास कराड शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता अटक केली. त्याच्याकडून 40 हजार रुपयांचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तांबोळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील सोहेल तांबोळी याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक फौजदार संतोष सपाटे, सतीश जाधव, हवालदार नितीन येळवे, संजय जाधव, गाडे यांनी मंगळवार पेठेतील हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यावेळी सोहेल तांबोळी तेथे आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल सापडले. गर्दी असल्याने पोलिसांनी आधी पिस्तूल काढून घेतले. तो पळून जाण्याच्या तयारीत होता; परंतु सतीश जाधव व सपाटे यांनी त्याला पकडून ठेवले. त्याच्या पॅंटच्या उजव्या खिशात दोन रिकाम्या मॅगझीन सापडल्या.