पाचगणी – महाबळेश्वर येथील कोळी आळीत दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या इंधनाची पाइप ढिली झाल्याने मोठा स्फोट झाला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसलेली नऊ लहान मुले किरकोळ आणि गंभीररित्या भाजली आहेत. जखमींवर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यातील गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.
महाबळेश्वर येथील कोळी आळीमधील दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक काल (दि. 24) निघाली होती. ही मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना, रात्री 8.45 च्या सुमारास ट्रॅक्टर (एमएच-11-डीएच-6490) ला जोडलेल्या विनानंबरच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या इंधनाची पाइप ढिली झाली. त्यामुळे जनरेटरचा स्फोट होऊन, शेजारी ठेवलेल्या कॅनमधील पेट्रोलने पेट घेतला.
या दुर्घटनेत ट्रॉलीमध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली 4 ते 7 वर्षे वयोगटातील नऊ लहान मुले भाजून जखमी झाली आहेत. त्यांच्यावर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यातील काही मुले गंभीररित्या भाजल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. या मुलांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील दसऱ्याचा कार्यक्रम सोडून साताऱ्यातील रुग्णालयात धाव घेतली. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून माहिती घेतली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक उमेश प्रताप पिसाळ (वय 28, रा. आखाडे, ता. जावळी) याच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.