पुणे :- शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच उच्छाद घातला असून, पुन्हा एकदा हुशार चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपी फोडली आहे. चोरट्यांनी मोबाईल शॉपीमधील तब्बल 52 लाख 30 हजार रुपयांचे 307 मोबाइल चोरून नेले आहेत. त्यात आयफोनसह इतर महागड्या मोबाईलचा समावेश आहे. याघटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मुकेश खुराणा (वय 39, रा. ताथवडे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरूवारच्या (दि. 21) रात्रीत घडला असून, शुक्रवारी (दि.22) उघडकीस आला आहे. तक्रारदार यांची सोमवार पेठेतील आगरकार शाळेसमोर खुराणा सेल्स मोबाईल शॉपी आहे. मध्यवस्ती मधील प्रसिद्ध असलेल्या मोबाईल शॉपीपैकी ही एक शॉपी आहे.
दरम्यान, मोबाईल शॉपीच्या पाठिमागील बाजूस एक पडीक बैठे घर आहे. दरम्यान, तक्रारदार हे नेहमी प्रमाणे गुरूवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मोबाईल शॉपी बंद करून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी पडिक घराच्या पाठिमागील बाजूने येऊन खुराणा यांच्या मोबाईल शॉपीच्या भिंतीलाच मोठे भगदाड पाडले. त्यातून आत प्रवेशकरून आतमध्ये असणारे सर्वच मोबाईल चोरून नेले.
चोरट्यांनी मोबाईल चोरून नेतेवेळी मोबाईल खोके काढून ते दुकानातच टाकून केवळ मोबाईल भरून नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता मोबाईल शॉपी उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांनी समर्थ पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीकरून चोरट्यांचा माग काढला जात आहे.