गुन्हेगारीचा पॅटर्न बदलतोयं; बंदुकीची जागा पुन्हा घेतली कोयता, तलवारीने

वाढलेली गुन्हेगारी पोलिसांची बनतेय डोकेदुखी


-अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – मागील काही वर्षांचा विचार केला तर बदलत चाललेल्या युगाबरोबरच गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत चालले आहे. समोरच्यांवर आपली दहशत गाजवण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हत्याराचा वापर करीत होत्या. काळानुसार बदल होवून या हत्याराची जागा बंदुका, गावठी कट्ट्याने घेतली. मात्र मागील काही महिन्यांमध्ये यामध्ये पुन्हा बदल झाला आहे.

दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गावठी कट्टा, बंदुकीची जागा पुन्हा एकदा कोयता, तलवार यासारख्या हत्याराने घेतली आहे. आज पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात मारहाणीच्या छोट्याश्‍या घटनेतही कोयत्याचा वापर केला जात असल्यामुळे तरुणांईने “मुळशी पॅटर्न’ मधल्या “आम्ही ठोकत नाही, तर डायरेक्‍ट तोडतो’ हाच विचार आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पोलिसांची डोकेदुखी वाढवणाऱ्याच असल्याचे दिसून येत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी, लुटमार पोलिसांची डोकदुखी बनली आहे. दररोज होणाऱ्या हाणामारीमध्ये शस्त्रांचा वाढलेला वापर शहरात गुन्हेगारी किती खोलवर रुजलेली आहे याचीच जाणिव करुन देत आहे. दोन गटामध्ये झालेल्या वादात कोयता, तलवार यासारख्या शस्त्रांचा वापर सर्रास होत आहे. याच शस्त्रांचा वापर आता नागरिकांना धमकावून त्यांना लुटण्यासाठीही होवू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड शहर खरेच सुरक्षित आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे. ज्या वयात अभ्यासाची गोडी अन्‌ भविष्य घडविण्याची जिद्द असायला हवी त्या वयातच अनेकांच्या हातांमध्ये शस्त्रे दिसू लागली आहेत.

चित्रपटांमधील कथानकांना वास्तव समजू लागल्याने अन्‌ झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासामुळे खुनासारखा गंभीर गुन्हा सहजगत्या केला जात आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालय उभे राहिल्यानंतरही गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना सध्या तरी अपयशच आले आहे. केवळ खूनच नव्हे, तर चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारख्या गुन्ह्यांमध्येही तरूण ओढले जात आहेत. किरकोळ भांडणातही कोयत्याने वार करुन जिव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारचे दररोज चार ते पाच गुन्हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचा मुळशी पॅटर्न प्रमाणेच आता पिंपरी-चिंचवडचा गुन्हेगारी पॅटर्न उदयास येत आहे. याला आता पोलीस कशा प्रकारे आळा घालता याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरकोळ कारण; महिनाभरात 20 जणांवर हल्ला 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीचे स्वरुप किती भिषण आहे हे आकडेवारी पाहिल्यानंतरच लक्षात येते. मागच्या महिन्याभरात 1 मे पासून किरकोळ करणावरुन हाणामारी, मारामारी होण्याच्या घटना मोठ्याप्रमाणात घडल्या आहेत. या घटनेमध्ये जवळपास 90 टक्के घटनांमध्ये हाणामारीमध्ये कोयता, तलवार, चाकू यासारख्या शस्त्राचा वापर करुन समोरच्यावर हल्ला करण्यात आला आहे. विषेश म्हणजे गुन्हे दाखल असलेले तरुण 20 ते 28 या वयोगटातील असल्यामुळे तरुण मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात 20 जणांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले आहेत. रावेत, चिखली, भोसरी, वाकड, निगडी, मोशी, दापोडी, चिंचवड यापरिसरात किरकोळ करणावरुन या घटना घडल्या आहेत.

हत्यारांचा धाक दाखवून होतेय लूट

मागील महिनाभरात रस्त्यावरील वाटसरुंना हत्याराचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाटसरूंना लुटण्याच्या घटनेत कोयता, तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन लुटल्याचे प्रकार घडले आहेत. महिन्याभरात लुटमारीच्या तब्बल 18 घटना घडल्या आहेत. यातून लाखो रुपयाचा ऐवज घेवून चोरटे पसार झाले आहेत.

दहशत पसरवण्याचा ‘टिक-टॉक ट्रेंड’

गुन्हेगारी स्विकारलेल्या तरुणांना आपली दहशत पसरवण्यासाठी सोशल मिडीयाचाही वापर करीत असल्याचे प्रकार मागच्या काही दिवसात समोर आले आहेत. सोशल मिडयावर कोयता तसेच तलवार हातात घेवून फोटो व व्हिडीओ प्रसिध्द करणाऱ्या दोघांना मागच्या पंधरवाड्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विविध चित्रपटातील अभिनेत्याचे डायलॉग घेवून हातात कोयता घेवून आपली दहशत पसरवण्याचा “टिक-टॉक’ ट्रेंड तरुण आमलात आणत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here