विलास लांडे, अण्णा बनसोडेंची विधानसभेची वाट बिकटच..!

भोसरी, पिंपरीतून महायुतीच्या उमेदवारास मताधिक्‍य

पिंपरी – लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर आता चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेल्या भरघोस मताधिक्‍यामुळे माजी आमदार विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांची आमदार होण्याची वाट बिकट बनली आहे. त्यातच पिंपरीतून शेखर ओव्हाळ यांनी तर भोसरीतून दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडे तिकीटाची मागणी करत या दोघांनाही अडथळा निर्माण केला आहे.

मागील आठवड्यात लोकसभेचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची बालेकिल्ल्यातच धुळधाण उडाली. शहरात प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपामध्येच विधानसभेचा सामना रंगणार आहे. शहरातील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीला धोबीपछाड मिळाला आहे. एकच समाधानाची बाब म्हणजे गतवेळी भोसरीतून महायुतीला 80 हजारांहून अधिक मतांचे लीड होते, ते आता 38 हजारांवर आले आहे. त्यामुळे भोसरीत राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी हे मताधिक्‍य घटविण्यात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तर या मतदारसंघातील माळी समाजाची एकगठ्ठा मते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाल्याचेही बोलले जात आहे.

लोकसभेतून माघार घेताना विलास लांडे यांना विधानसभेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. लांडे यांनी अद्यापपर्यंत तयारी चालविली नसली तरी त्यांचे विरोधक आमदार महेश लांडगे यांनी मात्र आतापासूनच जोर धरला आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विधानसभा काबीज करण्याच्या इराद्याने उतरलेल्या लांडगे यांना रोखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे असणार आहे. राष्ट्रवादी गटातटात विभागली गेल्यामुळे विजयाची आशा असतानाही पराभव पदरी पडल्याची अनेक उदाहरणे या पक्षापुढे आहेत. गतवेळी लांडे यांचा झालेला पराभवही अंतर्गत गटबाजीतूनच झाला होता. आता यावेळीही इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. लांडे यांना संधी मिळणार की नव्या दमाचा उमेदवार दिला जाणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरीतून बनसोडे अडचणीत

पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी हक्काचा मतदारसंघ असतानाही तब्बल 41 हजारांहून अधिक मतांची आघाडी महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघात मिळाल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची नाराजी अण्णा बनसोडे यांना भोवण्याची शक्‍यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि पिंपरीतून राष्ट्रवादीकडे तिकीटाची मागणी करणारे शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादीसाठी तगडे उमेदवार ठरण्याची शक्‍यता आहे. ओव्हाळ यांनी विधानसभेची तयारी चालविल्याने बारामतीकर त्यांनाच पसंती देण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी विधानसभेची जबाबदारी आण्णा बनसोडे यांच्यावर सोपविण्यात आली होती. बनसोडे यांनी अपेक्षित काम न केल्याचा फटका पार्थ पवार यांना बसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

त्यातच काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बनसोडे यांच्याविषयी तक्रारी सुरू केल्यामुळे आयत्यावेळी बनसोडे यांना डावलले जाण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडे ओव्हाळ यांच्याशिवाय इतरही अनेक इच्छुक असले तरी तिकीटाची स्पर्धा बनसोडे आणि ओव्हाळ यांच्यात रंगणार आहे. या दोघापैकी एकजणच उभे रहिल्यास राष्ट्रवादीच्या पारड्यात हा मतदारसंघ पडू शकतो. मात्र दोघांपैकी एकानेही बंडखोरी केल्यास पक्षापुढील अडचणी वाढणार आहेत. यातून पक्षश्रेष्ठी काय मार्ग काढतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.