पुणे – एकमेकाकडे पहाण्याच्या कारणातून झालेल्या वादात हडपसर परिसरातील एका 16 वर्षे मुलाला टोळक्याने विवस्त्र करून कोयत्यासह बेल्ट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. तसेच मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या तोंडावर टोळक्याने मुत्रविसर्जन केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तातडीने हालचाल करत चार आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद केले. त्यांच्यावर अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे. ही घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली. मारहाण केल्यावर त्याला रेल्वे ट्रॅक शेजारी बेशुध्दावस्थेत टाकून देण्यात आले होते.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी विनीत सूर्यकांत बिरादार (वय, 19 रा. भेकराईनगर), शुभम राजाभाऊ जाधव (वय 19 रा.समर्थ नगर पिंपरी-चिंचवड ) देविदास ऊर्फ देवा घनशाम पाहणे वय, 21, रा. काळेपडळ हडपसर ), भारत विशाल राठोड (वय, 21 रा. कुंजीर वस्ती ) सलीम कलिंदर शेख (वय, 22 रा.घुले वस्ती मांजरी ) या पाच जणांना अटक केली आहे. यासर्वांना न्यायालयात हजर केले असता 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या इतर दोन अल्पवयीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधीत आरोपींपैकी दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सर्व आरोपी हडपसर येथील वृंदावन हॉटेलमागे थांबले असताना त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस कर्मचारी रमेश साबळे, नितीन मुंढे, अकबर शेख, प्रशांत टोणपे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, शाहीद शेख यांच्या पथकाने केली.