पुणे – चीनसह जगभरात करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विमान प्रवाशांची संख्या घटली आहे.
पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून दररोज सुमारे 30 हजार प्रवासी जगभरातील विविध ठिकाणी ये-जा करतात. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शुक्रवारी दिवसभरात सुमारे 10 हजार तर, शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 8 हजार प्रवाशांनीच प्रवास केल्याची आकडेवारी विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
करोनामुळे विमान प्रवाशांची संख्या कमी झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. या आजारामुळे देशांतर्गत व परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील आठवडाभरात उल्लेखनीय घट झाल्याचे दिसून आले. यामुळे, विमानांची उड्डाणेही काही प्रमाणात कमी झाली आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्याकरिता सर्वच विमान कंपन्यांनी तिकीट दर सुमारे 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. तरीदेखील प्रवाशांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.