नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. युवराज दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. युवराजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने एका गोड मुलीला जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
युवराज सिंहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लाडक्या राजकुमारीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यासोबतच त्याने आपल्या लेकीचे नाव ‘ऑरा’ असे ठेवले आहे. युवराजने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”ऑराच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे”. ‘ऑरा’चा अर्थ वाऱ्याची झुळूक असा आहे.
युवराजची पोस्ट आणि त्याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट्स करत खेळाडूचे आणि अभिनेत्रीचे अभिनंदन करत आहेत. हरभजन सिंह, ऋचा चड्ढा, अंगद बेदी, तनिषा मुखर्जीसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत दोघांचे अभिनंदन केले आहे.
क्रिकेटर युवराज सिंह 2016 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकला. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. युवराज आणि हेजल 30 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर 25 जानेवारी 2022 रोजी त्यांना पहिला मुलगा झाला. युवाराज आणि हेजलच्या लाडक्या लेकाचं नाव ओपियन कीच सिंह आहे.