Sports In Pune :- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस ) तंत्रनिकेतनच्या वतीने आयोजित इंटर इंजिनीअरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट्स आसोसिएशन (आयईडीएसएसए) च्या डी-२ झोन अंतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ तंत्रनिकेतनच्या संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा केनेडी रोड येथील एआयएसएसएमएस च्या मैदानावर आयोजित करणेत आली. ही स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने झाली व त्यात एआयएसएसएमएस तंत्रनिकेतनच्या संघाने स्पर्धेचे विजेते पद पटकावले.
अंतिम सामन्यात जय वाखरे, साहिल भोसले आणि पार्थ गायकवाड यांनी केलेल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर एआयएसएसएमएस तंत्रनिकेतनच्या संघाने मराठवाडा मित्रमंडळ तंत्रनिकेतनच्या संघाचा ७२ धावांनी पराभव केला. अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना एआयएसएसएमएस तंत्रनिकेतनच्या संघाने ६ बाद १६२ धावा केल्या. जय वाखरेने २८ चेंडूत ३ चौकारासह २४ धावांची, साहिल भोसलेने १६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २१ धावांची तर पार्थ गायकवाडने नाबाद राहून १७ चेंडूत २० धावांची खेळी केली. जय वाखरे व अथर्व चतुर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
आव्हानाचा पाठलाग करताना मराठवाडा मित्रमंडळ तंत्रनिकेतनच्या संघाचा डाव सर्व बाद ९० धावा असा मर्यादित राहिला. प्रथम शिरोळ आणि ओम हिंगे यांनी केलेल्या सर्वाधिक धावा अपुऱ्या ठरल्या. गौरव खरड यांनी सर्वाधिक ३ गडी बाद केले.
IND vs ENG 3rd Test : जॉनी बेअरस्टोच्या नावावर ‘या’ नकोशा विक्रमाची नोंद…
विजेत्या संघाचे संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन केले. प्राचार्य एस.के.गिराम यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघास सन्मान चिन्ह व प्रशस्ती प्रत्र देऊन गौरवण्यात आले. विजेता संघ मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या आयईडीएसएसए च्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन एन.ए. ताकवणे, के.डी.वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.