IND vs ENG 3rd Test, Jonny Bairstow sets Unwanted Record : भारताविरुद्ध राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टो खातेही न उघडता बाद झाला. कुलदीप यादवने बेयरस्टोला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताविरुद्धच्या या ‘डक’सह इंग्लिश फलंदाजाने एक अतिशय नकोशा असा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता बेयरस्टो हा भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा खाते न उघडता बाद झालेला फलंदाज बनला आहे.
या नको असलेल्या विक्रमात बेअरस्टोने अनेक गोलंदाजांना मागे सोडले. गोलंदाज अनेकदा शेवटी फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतात आणि फलंदाजीचा फारसा अनुभव नसल्यामुळे ते खाते न उघडताच बाद होतात. पण फलंदाज असल्याने बेअरस्टो या नको त्या विक्रमात त्याच्याही पुढे गेला आहे. राजकोट कसोटीद्वारे बेयरस्टो भारताविरुद्धच्या कसोटीत 8व्यांदा शून्यावर बाद झाला.
बेअरस्टोने पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया आणि सध्याचा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायनला मागे टाकले आहे. कनेरिया आपल्या कारकिर्दीत भारताविरुद्धच्या कसोटीत 7 वेळा खाते न उघडता बाद झाला. याशिवाय नॅथन लायनही भारताविरुद्धच्या कसोटीत 7 वेळा खाते न उघडता बाद झाला आहे. कनेरिया 15 डावांत तर लियॉन 40 डावांत शून्याचा बळी ठरला आहे. या यादीत अनेक दिग्गज गोलंदाजांची नावे आहेत, ज्यामध्ये बेअरस्टो पहिल्या क्रमांकावर आहे.
भारताविरुद्धच्या कसोटीत ‘शून्या’वर बाद झालेले खेळाडू..
जॉनी बेअरस्टो (इंग्लंड) – 37 डावात 8 वेळा शून्यावर बाद
दानिश कनेरिया (पाकिस्तान) – 15 डावात 7 वेळा शून्यावर बाद
नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) – 40 डावात 7 वेळा शून्यावर बाद
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 52 डावांत 6 वेळा शून्यावर बाद
मर्विन ढिल्लॉन (वेस्ट इंडिज) – 15 डावात 6 वेळा शून्यावर बाद
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 22 डावात 6 वेळा शून्यावर बाद
भारताविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप…
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जॉनी बेअरस्टो आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत बेअरस्टोने अनुक्रमे 37 आणि 10 धावा केल्या. यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बेअरस्टोला अनुक्रमे 25 आणि 26 धावाच करता आल्या. आता राजकोट येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात (इंग्लंडच्या) इंग्लिश फलंदाज खाते न उघडता बाद झाला आहे.