पुणे – अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत एम.एस. एफ अंडर 12 संघाने रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाचा 4 गडी राखून सामना जिंकला.
एके मैदान, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत महेश्वर वाघच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एम. एस. एफ अंडर 12 संघाने रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाचा 4 गडी राखून पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 9 बाद 102 धावा केल्या. महेश्वर वाघ व आर्यन भामरे यांनी प्रत्येकी तीन तर, ईशान जाधवने दोन गडी बाद केले.
आर्यन भामरेच्या 29, गौरव गायकवाडच्या 19 तर माऊली बडेच्या 12 धावांसह एम.एस. एफ अंडर 12 संघाने 14.2 षटकात 6 बाद 103 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 24 धावांत 3 गडी बाद करणारा महेश्वर वाघ सामनावीर ठरला.