पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित प्रेसिडन्ट् करंडक नाईन-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत असोसिएशन पुना सोशल संघाने टायब्रेकमध्ये संगम फुटबॉल क्लबचा 5-4 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
मथुरावाला फुटबॉल मैदान, वानवडी येथे झालेल्या या स्पर्धेत असोसिएशन पुना सोशल संघाने अगदी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत अंतिम सामन्यात बाजी मारली. पूर्वार्धामध्ये गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धामध्ये पहिल्याच मिनिटाला संगम फुटबॉल क्लबच्या हर्ष उत्तेकर याने गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुना सोशलच्या जोएल लाकमुरूआपा याने गोल करून पुना सोशल संघाला 1-1 अशी बरोबरी निर्माण करून दिली.1-1 अशा बरोबरीमुळे टायब्रेकमध्ये सामना निकाली निघाला.
टायब्रेकमध्ये पुना सोशल संघाकडून साबिर शेख, ज्योएल लाकमरूआपा, विजय कमाने व स्टीवन थॉमस यांनी गोल केले. संगम एफसीच्या अविनाश सावंत, फिलीप डिसा व हर्ष उत्तेकर यांनी गोल केले. तर, नरसिंहा माघम आणि हर्षल गायकवाड यांना गोल करण्यात अपयश आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, पुणे कॅन्टोन्मेंटचे सचिन मथुरावाला आणि सचिव प्रदीप परदेशी यांच्या हस्ते झाले.