पुणे – सराईत गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस पथकावर शेकडोंच्या जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना येरवडा येथील कोतेवस्ती येथे रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. या नागरिकांना शक्ती सिंह नावाचा गुन्हेगार व त्याचे साथीदार परिसरातील नागरिकांना त्रास देत होते. नागरिकांची ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यातील पोलीस पथक शक्ती सिंह याला पकडायला गेले. त्यावेळी सिंह याने शिकलकरी समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर तेथील नागरिकांना पोलिसावर चालून आले. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि शक्ती सिंह याला पोलिासांनी ताब्यात घेतले.
“शक्ती सिंह हा सराइत गुन्हेगार असून, त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याने नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या तक्रारीवरून त्याला ताब्यात घेतले.”
– युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे