Cricket in Olympic : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( International Olympic Committee ) अखेर सोमवारी(16 आॅक्टोबर 2023) आयसीसीची विनंती मान्य करत 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजीलस शहरात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा अधिकृत समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळले जाणार आहे.
तुम्हाला माहितेय का… ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकदाच क्रिकेटचा खेळ खेळवण्यात आला होता. 123 वर्षांपूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. पण त्याआधी सुध्दा म्हणजेच 1896 साली अथेन्स येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण अपेक्षित देशांनी सहभाग नोंदवला नसल्याने आयोजिकांनी (Olympics in Athens in 1896) हा खेळ स्पर्धेतून रद्द केला.
त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) याचा समावेश करण्यात आला. तेव्हा देखील फार प्रतिसाद मिळाला नाही. फक्त चार देशांनी भाग घेतला. त्यातील एक यजमान देश फ्रान्स होते. त्यावेळी, चार संघ निवडण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या नावांचा समावेश होता, परंतु नेदरलँड्स आणि बेल्जियमने सामना सुरू होण्यापूर्वीच आपली नावे मागे घेतली, त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सच्या संघांमध्ये सुवर्णपदकासाठी विजेतेपदाची लढत झाली.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी नेदरलँड आणि बेल्जियम यांना फ्रान्ससोबत सह यजमानपद मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला होता. पण या दोन्ही देशांचे सह यजमानपद गेल्याने त्यांनी क्रिकेटमधून माघार घेतली. त्यामुळे दोनच देश शिल्लक राहिले एक यजमान फ्रान्स (France) आणि दुसरे ग्रेट ब्रिटन (Great Britain) होय.
या दोन संघामध्ये विजेतेपदाची लढत झाली आणि ग्रेट ब्रिटनने ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. तर पराभूत झालेल्या फ्रान्सला रौप्यपदक मिळाले. तिसरा संघच नसल्याने कांस्यपदक कोणालच मिळाले नाही.