क्रिकेटच्या शंभरपेक्षाही जास्त वर्षांच्या इतिसाहात डोकावले तर असे लक्षात येते की, जवळपास प्रत्येक कालखंडानंतर नवनवे बदल घडले आहेत. फलंदाजांचे व त्यांच्या फलंदाजीचे निकष जसे बदलत गेले तसेच गोलंदाजांच्याही भात्यात नवनवे चेंडू दाखल झाले. त्यातच आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त वापरला जात असलेला गोलंदाजांचे प्रमुख अस्त्र बनलेला चेंडू म्हणजे वुबल बॉल. खरेतर हा चेंडू नवा नाही, पण यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जास्त वेळा गोलंदाजांनी वापरल्यामुळे अचानक या चेंडूची चर्चा होऊ लागली आहे.
यॉर्कर, कटर्स, रॉंग वन, फास्टर वन, स्लोअर वन, बाउन्सर या पारंपरिक चेंडूंच्या जोडीला नक्कल बॉल, वाईड यॉर्कर आले आता तर यांच्या जोडीला हा वुबल बॉलही दाखल झाला व गोलंदाजांचा भाताही भक्कम झाला. जसे स्विंगिंग यॉर्करचा शोध सर्फराज नवाझने, रिव्हर्स स्विंगचा शोध वासिम अक्रम व वकार युनुस यांनी, एकाच ग्रीपवर इन व आऊट हे दोन्ही स्विंग कपिल देव यांनी शोधले असे मानले जाते. त्याच धर्तीवर नक्कल बॉल शार्दुल ठाकूरने शोधल्याचेही बोलले जाते.
आता हा वुबल बॉल सर्वात आधी इंग्लंडच्या जेम्स अँडरसन व पाकिस्तानच्या महंमद आसीफने टाकल्याचे मानले जाते. हा चेंडू ग्रीप करण्याची पद्धतही अनाकलनीय आहे. चेंडू सीमवर दोन बोटे व अंगठ्याच्या पकडीत स्लीपच्या दिशेने धरला जातो. हा चेंडू इतका अनाकलनीय असतो की, प्रत्यक्ष गोलंदाजालाही सांगता येणार नाही की तो कोणत्या दिशेला स्विंग होईल. हा चेंडू गोलंदाजाच्या हातातून रिलीज झाला की स्लीप, लेग स्लीप किंवा थेट सरळही जाऊ शकतो. हा चेंडू टाकताना गोलंदाज वाऱ्याची दिशा पाहून रिलीज करतात. तसेच चेंडूचा रफ पॅच (चकाकी घालवलेली बाजू) वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला ठेवतात व त्याचा झोत चकाकी असलेल्या दिशेवर पडतो व चेंडू हवेत विरुद्ध दिशेला स्विंग होतो.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत या चेंडूवर शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, उमरान मलिक, कुलदीप सेन, हर्षल पटेल या भारतीय गोलंदाजांनी सातत्याने बळी मिळवले आहेत. आता येत्या काळात हा चेंडू किती धोकादायक ठरेल हे प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दिसेल.
अँडरसन व आसीफने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये या चेंडूवर भल्या भल्या फलंदाजांना शरण आणले होते त्यामुळेच हा चेंडू सध्या गोलंदाजांच्या भात्यातील प्रमुख अस्त्र ठरत आहे.