नवी दिल्ली – भारताचा अव्वल धावपटू आणि मूळचा महाराष्ट्रातील बीड येथील मराठमोळ्या अविनाश साबळेने 5000 मीटरमध्ये बहादूर प्रसादचा 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम स्थापित केला आहे. 27 वर्षीय अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये 13:25.65च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला. या शर्यतीत अविनाशने 12वे स्थान पटकावले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा नॉर्वेचा जेकब इंजेब्रिग्टसेन हा विजेता ठरला. त्याने 13:02.03 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. बहादूर प्रसाद यांनी 1992मध्ये बर्मिंगहॅम येथे 13:29.70 सेकंदांच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रम केला, जो 30 वर्षे अबाधित राहिला. अविनाश सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने अमेरिकेत आहे.
बीडमधील मांडवा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला अविनाश साबळे हा भारतीय लष्करात शिपाई आहे. अविनाशच्या नावावर तीन हजार मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रमही नोंद आहे. त्याने स्वतःचा 3000 मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे. मार्चमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री -2 दरम्यान त्याने 8:16.21 सेकंदांच्या वेळेसह सातव्यांदा असे केले. गतवर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 8:18.12 सेकंदाच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रमही केला होता. युजीन, यूएसए येथे 15 ते 24 जुलैदरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो यापूर्वीच पात्र ठरला आहे.
भारतीय ऍथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर म्हणाले, आम्ही अविनाशला आशियाई खेळांमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस आणि 5000 मीटर या दोन्ही प्रकारात खेळविण्याची योजना आखत आहे. कारण त्याला दोन्ही स्पर्धांमध्ये पदकांची संधी आहे. परंतु दि. 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा वाढत्या कोविड-19 प्रकरणांमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.