– अमित डोंगरे
भारताचा स्टार व रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा अव्वल फलंदाज विराट कोहली हे काय रसायन आहे तेच समजेनासे झाले आहे. त्याची फलंदाजी जास्त आक्रमक आहे का त्याचा स्वभाव, हेच आता कोडे बनत चालले आहे. असेच वागत राहिला तर येत्या काळात त्याला कोणी तुझे नाव विराट आहे का, असे जरी विचारले तरीही तो चिडेल.
लखनौ विरुद्धच्या आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात लखनौचा कर्णधार लोकेश राहुलचा त्याने झेल घेतल्यावर मैदानावर जो अकांडतांडव केला तो सगळ्यांनी पाहिला असेल. आक्रमकता असावी पण ती खेळात, स्वभावात नव्हे हे ज्या दिवशी एखाद्या क्रिकेटपटूला समजते तेव्हा त्याचा विकास होतो नाही तर त्या खेळाडूचा गौतम गंभीर होतो. कोहलीसारखा गंभीरही मूळचा दिल्लीचाच असल्याने आणि दोघेही कधीकाळी भारतीय संघातून एकत्र खेळले असल्याने कोहलीने त्याच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श मानणारा कोहली इतका उर्मट कधीपासून बनला हे कळलेच नाही. मात्र, राहुलचा झेल घेतल्यानंतर मैदानावर आक्रमकता दाखवणारा कोहली सामना हातातून जात आहे हे लक्षात आल्यावर कसा हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून शांतपणे क्षेत्ररक्षण करताना दिसला. निकोलस पूरनला उद्देशून किंवा लखनौच्या खेळाडूंवर दडपण आणण्याची त्याची योजना पुरती फसली व पूरनच्याच वादळात बंगळुरूचा कधी धुव्वा उडाला ते कोहलीलाही कळले नाही.
इंग्लंड किंवा भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने स्लेजिंग करते किंवा मीडियागेम करते तेच कोहलीही शिकला आहे असेच वाटते. केवळ किंग कोहली म्हणून त्याचे कौतुक करण्यापेक्षा त्याच्या या दुसऱ्या वादग्रस्त बाजूकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो. त्याच्या याच आक्रमक स्वभावाने त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याच्या उर्मटपणामुळे तसेच तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी वाढलेल्या जवळीकीमुळे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली व कोहलीत तणाव निर्माण झाला.
कोहलीचे कर्णधारपदही गेले व ज्याच्याशी त्याची सर्वात जास्त स्पर्धा होती, त्याच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज त्याला खेळावे लागत आहे. आयपीएलचा भाग सोडा ती काय मे महिनाअखेरीस संपेल, पण कोहलीच्या स्वभावात बदल झाला नाही तर त्याच्या कारकिर्दीवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या याच स्वभावावर अनेक खेळाडूंनी खासगीत टीकाही केली आहे. बाकी सुज्ञास सांगणे न लागे. जरा कठीणच दिसत आहे, पण तरीही पाहुया या पराभवातून तरी तो काही शिकतो का?