पाटण (प्रतिनिधी) –कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून रविवारी सकाळपासून कोयना पाणलोट क्षेत्राच्या महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली असून एकूण 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाचे चार दरवाजे एक फूट उचलण्यात आले असून धरणातून 8 हजार 474 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. प्रतिसेकंद कोयना धरणात 12 हजार 131 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी व धरणात येणाऱ्या पाण्याच्या नियंत्रणासाठी कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सकाळी 1 हजार 50 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. मात्र पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा सायंकाळी पायथा विजगृहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली. बारा तासात कोयना 65 मिमी, नवजा 59 मिमी, महाबळेश्वर 11 मिमी, वळवण 16 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.