एकगठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
पुणे -विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला आलेला रविवार उमेदवारांसाठी सर्वाधिक धावपळींचा ठरला. जाहीर प्रचार शनिवारीच संपलेला असला तरी, मतदारसंघातील नाराजांची मनधरणी करणे आणि वेगवेगळ्या भागातील एक गठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांकडून नाराजांची मनधरणी करण्यासह भेटीगाठी घेण्याचा ठरला, त्यामुळे जवळपास सर्वच उमेदवारांच्या कार्यालयात दिवसभर अनेक कार्यकर्ते, उमेदवारांची वाट पाहताना दिसून आले.
शहरात आठही मतदारसंघांत महायुतीविरोधात महाआघाडी अशी दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवार व्यस्त असतानाच; महायुतीकडून आघाडीचे माजी नगरसेवक तसेच प्रचारातील प्रमुख पदाधिकारीच आपल्या गळाला लावत आघाडीच्या उमेदवारांना धक्के दिले आहेत. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस आधी पुन्हा असा प्रकार घडल्यास तसेच मतदार माननाने प्रमुख नेते तसेच पदाधिकारी विरोधीपक्षास आयत्यावेळी सहभागी झाल्यास अडचण नको, म्हणून उमेदवारांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात आला. तसेच, सोमवारच्या मतदानासाठी मदत करण्याचा शब्द पदरात पाडून घेण्यात आला. त्यामुळे रविवारी अनेक उमेदवार दिवसभर फोन बंद करूनच गायब असल्याचे चित्र होते.
नेते खूश; कार्यकर्ते नाराज
सोमवारी मतदानाचा दिवस असल्याने उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये ब्लॉक प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. तसेच, त्यांच्याकडून उमेदवारांना फोनही केले जात होते. मात्र, उमेदवार त्यांना प्रतिसाद देत नव्हते. तर दिवसभर कार्यालयात थांबल्यानंतरही या कार्यकर्त्यांशी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलण्यास कोणीही तयार नव्हते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते हिरमसून तर, काही उमेदवारालाच आपली गरज नाही आपण वेळ का घालवायचा, असे म्हणून कार्यलयातून उपस्थितांसमोरच नाराजी व्यक्त करून निघून जात असल्याचे चित्र आहे.