नागठाणे -बेकायदेशीररीत्या देशी कट्टा (रिव्हॉल्व्हर) बाळगल्याप्रकरणी समीर सुनील घोरपडे (वय 22, रा. मत्यापूर, ता. सातारा, हल्ली रा. चौंडेश्वरी हॉलच्या मागे, नागठाणे) या रेकॉर्डवरील गुन्हेगारास बोरगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. नागठाणे येथे महामार्गावरील बाबा पंजाबी ढाबा येथे ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे येथील हॉटेल बाबा पंजाबी ढाब्याजवळ एक युवक कमरेला रिव्हॉल्व्हर लावून फिरत असल्याची माहिती बोरगावचे सपोनि डॉ. सागर वाघ यांना मंगळवारी सायंकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. संबंधित युवक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तेथे दिसला.
पोलिसांना पाहताच कावराबावरा होऊन तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, सुमारे 40 हजार 500 रुपये किमतीचे देशी रिव्हॉल्वर कमरेला लावलेले आणि पाच जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने आपले नाव समीर सुनील घोरपडे असल्याचे सांगितले. हा देशी कट्टा पाच वर्षांपूर्वी
एका बिहारी व्यक्तीकडून नागठाण्यातच विकत घेतल्याचे समीरने पोलिसांना सांगितले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे, किरण निकम, विशाल जाधव, विजय साळुंखे, प्रकाश वाघ व कपिल टिकोळे यांनी ही कारवाई केली. सहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे तपास करत आहेत.