गोंदवले -स्वस्तात सोने देतो, असे सांगून खटाव तालुक्यातील जयरामस्वामीचे वडगाव येथील एका चिकन व्यावसायिकास दहिवडी येथे बोलावून त्याला मारहाण करून त्याच्याजवळील रोख एक लाख 80 हजार रुपये घेऊन तीन जणांनी पोबारा केला. मात्र, दहिवडी पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतले. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिकन जयरामस्वामींचे वडगाव येथील व्यावसायिक तौफिक हारुणअली मुलाणी (वय 29) यांचे चिकन विक्रीचे दुकान असून त्याचा परिचय त्याच गावातील लखन पोपट भोसले याच्याशी होता. पोपट भोसले याने तौफिकला “माझ्या ओळखीच्या काही लोकांकडून तुला कमी पैशात सोने घेऊन देतो,’ अशी बतावणी केली. स्वस्तात सोन्याचे दागिने मिळणार असल्याने मुलाणीला याचा मोह सुटला आणि तो या गोष्टीला तयार झाला.
त्यानुसार मंगळवार दि. 20 रोजी मुलाणी याला सोन्याचे दागिने देण्यासाठी दहिवडी येथे बोलावून घेतले.दहिवडी येथील गोंदवले रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल गंगासागरमध्ये त्याला लखन भोसले, अभिजित कालिदास पवार (वय 21, रा. वेटणे ता. खटाव) व अनोळखी एक व्यक्ती या तिघांनी मिळून हॉटेलच्या पाठीमागे दागिने देतो, अस सांगून तिथल्या कॅनॉलच्या मागे नेले आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून धारदार शस्त्र गळ्याला लावून त्यांच्या जवळचे पैसे काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी तेथून पोबारा केला.
तौफिक मुलाणी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, पुसेगाव पोलीस ठाण्याचे विश्वजित घोडके यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करत अभिजित पवार याच्यासह घायल रायचूर शिंदे (वय 25, रा. कटगुण ता. खटाव) प्रवीण पोपट भोसले (वय 30 वर्ष रा. दहिवडी) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यात तपासासाठी दहिवडी पोलीस ठाण्यतील अशोक हजारे, प्रकाश हंगे, संजय केंगले, केतन बर्गे, रवींद्र बनसोडे, प्रमोद कदम, योगेश बागल, गणेश वाघमारे, लखन कुचेकर यांनी सहभाग घेतला