नांदेड – जलयुक्त शिवारच्या कामात क्लीन चिट मिळालेली नाही. पुड्या सोडून पापे झाकली जात नाहीत. 71 टक्के कामात अनियमितता आढळली असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी सचिन सावंत नांदेड येथे आले होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सावंत म्हणाले की, जलयुक्त शिवारमध्ये क्लीन चिट मिळालेली नाही. कुठेना कुठे खोट्या बातम्या सोडायच्या आणि स्वत:लाच क्लीन चिट मिळाल्याचे सांगायचे. याबाबत राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. कुठल्याही प्रकारचा अहवाल आला नाही. कॅगमध्ये जो अहवाल दिला होता त्यात गावातील पाणी शिवारात, भूजल पातळीत वाढ करणे, जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र वाढवणे या तीन गोष्टींमध्ये योजना अपयशी ठरली आहे.
71 टक्के कामात अनियमित्ता आढळली गेली आहे. हजारो कोटींचा या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. त्याविरूध्द सातत्याने आवाज उठवण्यात आला होता. त्या वेळीही त्यांना स्पष्टीकरण देता आले नाही. केंद्र सरकारवरही सचिन सावंत यांनी सडेतोड टीका केली.