लोणावळा – सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच हॉटेल व्यावसायकांनी सुरक्षेबाबत काय खबरदारी घ्यावी, याबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा परिसरातील हॉटेल व्यावसायकांची सोमवारी (दि.12) बैठक घेत पोलीस प्रशासनाकडून विभागीय पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक व शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी सूचना दिल्या.
ख्रिसमस व नवीन वर्षाचा स्वागतासाठी लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ते शहरातील खाजगी बंगले, हॉटेल्स व फार्महाऊस इत्यादी ठिकाणी राहतात. सध्या दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यतेच्या अनुषंगाने काही अनुचित प्रकारच्या घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आपले हॉटेल, बंगले, फार्महाउस याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उपाययोजना पुढीलप्रमाणे-
हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांची हॉटेलमध्ये प्रवेश करताना तपासणी व त्यांचे ओळखपत्र तपासुनच प्रवेश द्यावा.
हॉटेल प्रवेशव्दारावर मेटल डिटेक्टरची व्यवस्था करावी. नववर्ष स्वागत कार्यक्रमाचे ठिकाणी काही अप्रिय घटना घडलेस तात्काळ मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, मेडीसीनची व्यवस्था ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी व परिसरात बेवारस वस्तु तसेच कोणी संशयीत इसम आढळल्यास त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती कळवावी.
कार्यक्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, याकरिता इमरजन्सी एक्झिटची व्यवस्था करावी.
विद्युत रोषणाईकरिता अधिकृत वीजजोड घेऊन महावितरण कार्यालयाकडून तपासणी करून घेत, शॉर्ट सर्किटसारखे प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
पर्यटकांची वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. पार्किंग प्रवेशद्वारावर सर्व वाहनांचे नंबर येतील, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. प्रत्येक वाहनाच्या चालकाचे नाव व पत्ता तसेच लायसन्स नंबर रजिस्टरमध्ये नोंदवावा. तसेच वाहनाच्या तळभागाची तपासणी करण्याचा आरसा ठेवावा.
हॉटेल कर्मचाऱ्यांची बैठक घेउन त्यांना घातपाती कृत्य घडण्याच्या शक्यतेच्या अनुषंगाने सूचना देण्यात याव्यात. तसेच हॉटेलमधील लॉन, कुंड्या, हॉटेलच्या रूम डस्टबीन स्टोअर रूम, गॅप पॅसेज आदी ठिकाणे तपासावीत. हॉटेल मधील लॉबी, जीने, पार्टीची ठिकाणे, लोक एकत्र येतील अशा सर्व ठिकाणी तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन हॉटेलचा परिसर कॅमेऱ्यामध्ये कव्हर करण्यात यावा.
मद्य प्राशन केलेल्या लोकांकडून महिलांची छेड काढल्याचे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व्यवस्थापनाला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
हॉटेल मधील अग्नीशमन यंत्रणा कार्यान्वित आहे का याची खात्री करून ती सज्ज ठेवावी.