तळेगाव नगरपरिषद : प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांच्या तक्रारी
वडगाव मावळ – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगराध्यक्ष व सर्व प्रभागाचे नगरसेवक प्रभागात फिरून नागरिकांना करोना विषाणूची जनजागृती करत आहेत. प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक दशरथ केंगले हे भोसरी परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
नागरिकांच्या सोयीसुविधासाठी तसेच प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी पुढे आले नसल्याची ओरड आहे. वडगाव नगरपंचायतीची स्थापना 3 फेब्रुवारी 2018 रोजी झाली.नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या हद्दीत विकास कामे करायची आहेत.
नगरसेवक प्रभागात फिरकत नसल्याने नगरसेवक हरवले आहे की काय अशा अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत. नगरसेवक केंगले यांच्याकडे दोन मोबाईल क्रमांक असून, त्यांना नागरिकांनी फोन लावल्यावर दोन मिनिटांत फोन करतो, असे बोलून नगरसेवक केंगले मोबाईल बंद करतात. प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा कारभारी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी तक्रार युवा उद्योजक बजरंग ढोरे, प्रथमेश साबळे, संजय पराठे, सनी कोळेकर, अनिल गुरव, शशिकांत गराडे, संदीप सोनवणे, नितीन पिंगळे, राम परीट, अनिस शेख, मनोहर शिंदे आदींसह अनेक नागरिकांनी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात नगरसेवक दशरथ केंगले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले म्हणाल्या की, नगरसेवक नगरपंचायतीच्या बैठकीला उपस्थित असतात, पण ते प्रभागात फिरकत नसल्याच्या अनेक नागरिक तक्रार करीत आहेत.