आठ दिवसांत 690 नवीन रुग्ण, तर 411 जण बरे
पुणे – शहरात नव्याने करोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच; या आजारावर मात करून घरी परतणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाची लक्षणे दिसताच न घाबरता आणि आजार न लपविता समोर आल्यास या साथीला अटकाव घालणे शक्य आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात 690 नवीन करोना बाधित आढळून आले असले तरी तब्बल 411 जण आजारावर मात करून घरी गेले आहेत. म्हणजेच दिवसाला 50 जण बरे होऊन घरी जात आहेत.
यासोबत नव्याने बाधा होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत उपचार घेत केसेसचे तुलनात्मक प्रमाण घटले आहे. एका आठवड्यात हे प्रमाण 79 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत खाली आले असल्याने ही शहरासाठी दिलासादायक बाब असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
शहरातील करोना बाधित रुग्णांचा आकडा 6 मे रोजी 2 हजार 29 पर्यंत गेला आहे. मात्र, त्याचवेळी आता शहरात नवीन रुग्ण वाढत असतानाच बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 28 एप्रिल रोजी शहरात एकूण 1,339 करोना बाधित रुग्ण होते, तर त्यातील 1,057 रुग्णांवर उपचार सुरू होते. 6 मे रोज या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या पाहिली असता लागण झालेले रुग्ण 2 हजार 29 आहे. मात्र, त्याचवेळी प्रत्यक्षात उपचार घेणारे रुग्ण केवळ 1,324 आहेत. म्हणजेच आठवड्याभरात रुग्णसंख्या 690 ने वाढली असली तरी त्याच वेळी सुमारे 411 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
मागील आठवड्याभरातील आकडेवारी पाहिली असता दिवसाकाठी सर्वसाधारणपणे 50 रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत घटले आहे. हे प्रमाण 65 टक्क्यांवर आले आहे. ही सकारात्मक बाब असून करोनाचा प्रादुर्भाव कमी करणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
– रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त (जनरल), पुणे महापालिका