स्थानिक नागरिकांचा विरोध; सहाय्यक क्षेत्रीय आयुक्तांच्या गाडीला गराडा घालीत आंदोलन
वडगाव शेरी – खराडी स्पोर्टस कॉम्प्लेक्स मध्ये (प्रभाग 4) पुणे महानगरपालिकेच्या क्वारंटाइन केंद्रात विलगीकरण केलेले रुग्ण ठेवण्याऐवजी करोनाबाधित रुग्णांना ठेवले जात असल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन करीत याला विरोध केला. यावेळी नागरिकांनी सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त राजेश बनकर यांच्यापुढे मागण्या मांडल्या, बनकर यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी माजी आमदार बापू पठारे, संतोष भरणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत संतोष भरणे म्हणाले की, विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यास आमचा विरोध नाही. परंतु, करोना पोझिटीव्ह रुग्ण येथे आणाले जात आहेत, त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. जेथे त्यांच्यावर उपचार करता येतील, अशा रुग्णालयात त्यांना ठेवले पाहिजे. हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. येथे कोणतीही सुविधा नाही, कोणत्या रुग्णाला त्रास होऊ लागला की, काही तासांनी रुग्णवाहिका येते आणि घेऊन जाते; म्हणजे प्रशासनाला येथील रुग्णांची खरोखरच काळजी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
ज्या ठिकाणी उपचाराच्या सुविधा आहेत, अशा ठिकाणी बाधित रुग्ण ठेवावेत. परंतु, स्पोर्ट कॉम्प्लेक्स सारख्या कोणतीही सुविधा नसलेल्या ठिकाणी रुग्ण ठेवले जात आहेत. या ठिकाणी बहुतांशी ठिकाणच्या काचा फुटलेल्या आहेत. काही खोल्यांना दरवाजे नाहीत. वापरलेल्या वस्तू रुग्ण तसेच ठेवतात. रुग्णांनी वापरलेले चहाचे कप, कपडे, मास्क असे बाहेर फेकले जात असल्याने लगतच्या सोसायट्यांमध्ये येतात. यातून येथील नागरिकानाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्वॉरंटाइन केंद्र अन्य ठिकाणी असावे, अशी आमची मागणी आहे.
रक्षकनगर गोल्ड वसतिगृहात करोनाचे रुग्ण नको, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. या ठिकाणी आयुक्त येणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नागरिक जमले होते. आयुक्त कामानिमित्त येऊ शकले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून निवेदन स्वीकारले असून ते पुढे पाठविणार आहे.
– राजेश बनकर, सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त, पुणे
स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये योग्य सुविधा नाहीत. परिसरात हजारो नागरिक राहातात, त्यांचा जीव का धोक्यात आणायचा? पालिकेच्या रुग्णालयात रुग्ण का ठेवत नाही? विलगीकरण कक्ष करण्यास कुठलाही विरोध नाही. परंतु, करोना बाधित रुग्ण ठेवायला आमचा विरोध आहे.
– बापू पठारे, माजी आमदार