ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; साखळी निर्माण होऊ न देण्याचे प्रशासनापुढे आव्हान
कराड (प्रतिनिधी) – कराड तालुक्यातील वनवासमाची (खोडशी) गत महिन्याभरापूर्वी करोनाचे “हॉटस्पॉट’ ठरले होते. आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हे गाव करोनामुक्त झाले. वनवासमाचीत पुन्हा नव्याने ट्रॅंव्हल हिस्ट्री असणाऱ्या एका 60 वर्षीय पुरूषाचा वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने वनवासमाचीतील ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. बाधिताच्या संपर्कातील चारजण हायरिस्क असून बाधित रुग्ण वास्तव्यास असणारा परिसर पोलिसांनी सील केला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांनी दिली.
वनवासमाचीत नागपूर ट्रॅव्हल हिस्ट्री असणारा पहिला करोना बाधित युवक दि. 21 एप्रिल रोजी मिळून आला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे 39 करोनाबाधित रूग्ण मिळून आले. त्यावेळी खडबडून जागा झालेल्या आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती.अथक परिश्रमानंतर प्रशासनाला वनवासमाची तब्बल 46 दिवसानंतर करोनामुक्त करण्यात यश आले. गाव करोनामुक्त झाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता.
दरम्यान, दि. 3 जुलै रोजी एक दाम्पत्य भिवंडी येथील काम करत असलेल्या व मद्रास येथे जाणाऱ्या एकाच्या चार चाकी कारमधून गावाकडे आले. सदरच्या दाम्पत्याला कारने तासवडे येथील टोल नाक्यावर सोडण्यात आले होते. तर कारमधील अन्य तीन जणांसह कार मद्रासकडे रवाना झाली. त्यानंतर रात्रीच्या वेळी सोडण्यात आलेले दाम्पत्य एका खासगी वाहनाने वनवासमाचीत आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यानच्या कालावधीत काही दिवसानंतर भिवंडीहून आलेल्या या दाम्पत्यातील 60 वर्षीय पुरूषास शारीरिक त्रास जाणवू लागल्याने त्याला दि. 16 जुलै रोजी कराड येथे उपचारार्थ आणण्यात आले होते. त्याची स्वॅब तपासले असता ते पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा गावात करोनाची एन्ट्री झाली आहे. प्रशासनाकडून संबंधित परिसर सील करण्यात आला आहे. तसेच संबंधिताच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.