वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा जण क्वारंटाइन
रेठरे बुद्रुक (वार्ताहर) – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या घरातीलच व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र सील करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना आरोग्य केंद्रातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील जवळपास दहा गावामध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. मुख्य आरोग्य केंद्र सील करण्यात आले असलेतरी इतर उपकेंद्रामार्फत आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशातच ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविणारे आरोग्य केंद्रच सील करून क्वारंटाइन केले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खुबी ता. कराड येथील बाधित व्यक्ती जत येथे गेली होती. तिथेच त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली होती. तेथून ती आठवड्यापूर्वी खुबी येथे आली. मंगळवारी पुन्हा त्रास वाढल्याने येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. तिथून संशयित म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविले असता करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित व्यक्तीचा निकट सहवासीत हा रेठरे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य केंद्रच सील करण्यात आले आहे.
करोना महामारीच्या काळात लोकांचे तारणहार ठरलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी असे दहाजण आरोग्य केंद्रातच क्वारंटाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांना आरोग्य सेवा देणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या सलाईनवर आहे.
करोना बाधितांच्या निकट सहवासीत असलेल्या आरोग्य केंद्राच्या त्या कर्मचाऱ्याचा अहवाल काय येतोय यावर येथील आरोग्य केंद्राच्या क्वारंटाइन केलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पुढील चित्र अवलंबून आहे. तो निकट सहवासीत कर्मचारी हा आरोग्य केंद्रातील सर्वांच्या संपर्कातील आहे. त्यामुळे जर ती व्यक्ती बाधित आली तर क्वारंटाइन असलेले डॉक्टर व कर्मचारी हाय रिस्कमध्ये येऊ शकतात. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्ती करोनाबाधित आली आहे. संबंधित कर्मचारी आरोग्य केंद्रात सर्वांच्या संपर्कातील आहे. संबंधित कर्मचाऱ्याचा करोना रिपोर्ट अजून आलेला नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य केंद्र सॅनिटाइझ करून सील करण्यात आले आहे. आम्ही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य केंद्रातच क्वारंटाइन झालो आहे. रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र मोठे असून फक्त रेठरे बुद्रुक येथील मुख्य आरोग्य केंद्रच खबरदारी म्हणून बंद ठेवले आहे. इतर ठिकाणी आमच्या आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू आहे. आशा, स्वयंसेविका, आरोग्यसेविका आरोग्य सेवक यांचे इतर गावातील कामकाज सुरू आहे,
डॉ. अनिता कदम, वैद्यकीय अधिकारी,रेठरे बुद्रुक