आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
निगडी – करोनाने सध्या माणसांचे जगणे मुश्कील केले आहे. करोनाच्या रूपाने समाजावर, देशावर आलेले हे महाभयंकर संकट आहे. यावर प्रत्येकाने जबाबदारीने मात करणे गरजेचे आहे. करोनाला प्रतिबंध करून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोविड चाचणी सेंटर उभारण्यात येत आहेत. यामध्ये परिसरातील डॉक्टरांनी रुग्णांसाठी आपण त्यांचे फॅमिली डॉक्टर आहोत असे समजून विना मोबदला सेवाभावी वृत्तीने काम करावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविल्या जातील. कोणत्याच गोष्टी कमी भासू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार लांडगे यांनी केले. ते रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या करोना चाचणी सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, प्रभागाचे माजी नगरसेवक शांताराम (एस. के.) भालेकर, सुरेश म्हेत्रे, स्वीकृत सदस्य फ प्रभाग पांडुरंग भालेकर, रमेश भालेकर, कुंडलिक वऱ्हाडी, डॉ. धनंजय वर्णेकर, नीलेश भालेकर, किरण पाटील, रामदास कुटे, राजू तापकीर उपस्थित होते.
विनामोबदला सेवा देण्यासाठी डॉ. संजय आव्हाळे, डॉ. दिलीप जानुगडे, डॉ. पांडुरंग काळे, डॉ. प्रदीप खेडकर, डॉ. सुधीर घाडगे, डॉ. बाळासाहेब नाकाडे, डॉ. महेश मारणे, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. पाचपांडे, डॉ. राम तांबे, डॉ. संदीप सांडभोर यांनी बांधिलकी स्वीकारून या सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना विनामोबदला सेवा देणार असल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक शिवशरण सालोटगी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.