संयुक्तराष्ट्रे – डेल्टा व्हेरिएंटच्या करोनाच्या केसेस जगभरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे तेथे या व्हेरिएंटच्या प्रसाराचा धोका अधिक असल्याने जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा मोठा ताण येण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
काल मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेने आपला साप्ताहिक आढावा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात हा इशारा देण्यात आला आहे. 13 जुलैपर्यंत जगातील 111 देशांमध्ये करोनाच्या डेल्टा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. आणि येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढण्याचीच शक्यता आहे असे यात नमूद करण्यात आले आहे.
जगभरातील पाहणीनुसार 178 देशांमध्ये अल्फा विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर 123 देशांमध्ये बिटा विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 75 देशांमध्ये गॅमा जातीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. अन्य कोणत्याही विषाणूंपेक्षा डेल्टा विषाणू खूप वेगाने लागण करीत असतात. त्यामुळे येत्या काही महिन्यांत या विषाणूंमुळे करोनाची लागण होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या विषाणूंचा मोठा धोका असतानाच जगभरात अनेक ठिकाणी निर्बंधांना दिली गेलेली सूट आणि लसीकरणाचे कमी झालेले प्रमाण यामुळे हा विषाणू अत्यंत धोकादायक रीतीने प्रसारण पावण्याची शक्यता आहे. काही देशांनी आता पुन्हा नियमित विमान प्रवासाला अनुमती दिल्यानेही या धोक्यात वाढच होण्याची शक्यता यात व्यक्त करण्यात आली आहे.